#CoronaVirus:जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 43 लाखांवर, 16 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले
मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 43 लाख 35 हजार रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या दोन लाख 92 हजारांवर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 92 हजार 815 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 30 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर. भारतात आत्ता कोविडचे 74 हजार 292 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2415 बळी गेले आहेत.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेने गेल्या 24 तासात 1630 लोक गमावले आहेत. तर एकूण बळी 83 हजार 425 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजारांवर गेली आहे.न्यूयॉर्क प्रांतात काल 172 बळी गेले. तिथे एकूण मृतांचा आकडा 27 हजार 175 तर रुग्णांची संख्या 3 लाख 48 हजारांवर गेली आहे.