#CoronaVirus: कोरोनाविरोधी लस तयार करण्यात इटलीतील संशोधकांना यश
करोना विषाणूवर पहिली लस शोधल्याचा दावा इटलीच्या संशोधकांनी केला असून या लशीने उंदरांवरील प्रयोगात करोना विरोधी प्रतिपिंड (अँटीबॉडी) निर्माण झाले आहेत. इटलीत तयार करण्यात आलेली ही लस चाचण्यांच्या पातळीवर खूप प्रगत टप्प्यात असून सार्स सीओव्ही २ या करोना विषाणूवर मात करण्यात त्यामुळे यश येण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
या लशीच्या चाचण्या उंदरात बऱ्याच यशस्वी झाल्या असून त्यात मानवी पेशीत काम करू शकतील असे प्रतिपिंड निर्माण झाले आहेत. संशोधकांनी आतापर्यंत पाच लस घटकांच्या चाचण्या करून त्यातील दोन निवडले आहेत. रोम येथे असलेल्या स्पॅलनझानी नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इनफेक्शियस डिसीजेस या संस्थेतील वैज्ञानिकांनी ही लस तयार केली असून सध्या जगात शंभर लशींवर प्रयोग सुरू आहेत.
‘टॅकीस’ या लस निर्मात्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ल्युगी ऑरिशियो यांनी म्हटले आहे की, या लसीने मानवातील करोना विषाणू मारला गेल्याचेही दिसून आले आहे. ही लस अत्यंत प्रगत टप्प्यावर असून मानवी चाचण्या लवकरच सुरू होतील. रोम येथील स्पॅलसनझानी रुग्णालयात या लसीचे प्रयोग उंदरावंर करण्यात आले असता त्यात मानवी पेशीतही उपयुक्त ठरू शकतील असे करोनाविरोधी प्रतिपिंड तयार झाल्याचे दिसून आले. लसीच्या मदतीने करोना विषाणू मारण्याचा पहिला प्रयोग आम्हीच केला आहे. त्यामुळे आता मानवातही तो यशस्वी होईल.
नेमके काय संशोधन
करोना विषाणूच्या डीएनए प्रथिनांच्या जनुकीय रचनेचा विचार करून लशीचे प्रयोगशील घटक तयार करण्यात आले होते ते इलेक्ट्रोपोरेशन तंत्राने ते स्नायूत टोचण्यात आले. त्यानंतर या उंदरांना सौम्य विद्युत धक्का देण्यात आला त्यामुळे ही लस पेशींमध्ये पसरली त्यामुळे प्रतिकारशक्ती प्रणाली कार्यान्वित होऊन प्रतिपिंडांची निर्मिती झाली. त्यामुळे विषाणूचे संरक्षण आवरण असलेले मेदथरयुक्त प्रथिन फुफ्फुसातील पेशीत नष्ट करण्यात यश आले. फुफ्फुसांच्या पेशी करोना विषाणूला प्रामुख्याने बळी पडत असतात.