आधी योगा आणि आता फिटनेसच्या खुळाने, मंत्रीच दालनात जोर बैठका काढतोय – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/download-1-1.jpg)
पिंपरी – अगोदर योगा आणि आता फिटनेसचं खुळ या सरकारच्या डोक्यात आलं आहे. जो तो मंत्री उठतो आणि जोर बैठका काढत आहे. पण तुमचं फिटनेस बघून काही उपयोग नाही. जनतेत मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जोर मारण्याची ताकद राहिलेली नाही असं म्हणत भाजपा सरकारच्या फिटनेस उपक्रमाची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, “भिकाऱ्याला परवडेल असं घर देणार म्हणताय. हरकत नाही मग झोपडपट्टीवासियांना पण घरं द्या. मध्यमवर्गीयांनाही फ्लॅट द्या. सोफासेट, बेड, वीज हे यात फुकट देणार म्हणताय हे शक्य नसून केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत”.
“भंडारा-गोंदिया आणि पालघरमध्ये काय पहिल्यांदाच उष्णता वाढली का? उगाच ईव्हीएम मशीन बिगाडीला काहीही कारण पुढं करतायेत. आज ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान आहे. पण हे लोकशाहीला मारक आहे, असं होता कामा नये. काही राज्यात दलितांच्या घरी जेवायचं नवं खुळ भाजपने काढले होते, मात्र दलितांच्या घरी जायचं आणि हॉटेल मधून डब्बा मागवायचा हे त्या नेत्यांच असायचं. राष्ट्रवादीला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम भाजपा नेत्यांनी केलं होतं. त्यांनी आता आत्मचिंतन करावं. आमच्यावेळी सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झालेला नाही”, असंही अजित पवार म्हणाले.