#waragainstcorona : आमदार सुनील शेळके यांची नागरिकांना भावनिक साद; आता घराबाहेर पडू नका…प्रशासनाला सहकार्य करा!
– 45 दिवस झुंजणाऱ्या मावळ तालुक्याला पहिला धक्का
– पुण्यातून आलेल्या दोन मुलींना कोरोनाची लागण
मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी
‘प्रशासनाला सहकार्य करणार…मावळातून कोरोनाला हद्दपार ठेवणार’… असा निर्धार मावळ तालुक्यातील नागरिकांनी केला होता. आमदार शेळके यांचे विविध उपक्रम आणि प्रशासनाची अचूक कामगिरी यामुळे गेले ४५ दिवस ही लढाई मावळकरांनी लढवली. मावळ तालुका कोरोनामुक्त राहणार…अशी चिन्हे दिसत होती. मात्र, बुधवारी मावळकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली. दिवसभर ‘सोशल मीडिया’वर उलटसुलट चर्चा सुरू होती. अखेर सायंकाळी प्रशासनाने पुण्यातून देहुरोड येथे आलेल्या कुटुंबातील दोन मुली कोरोनाबाधित असल्याचे अधिकृत जाहीर केले.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण अढळल्याची बातमी समजताच आमदार सुनील शेळके यांनी तात्काळ देहुरोड येथे धाव घेतली. स्वत: उभे राहुन देहुरोड कॉन्टोंमेन्ट बोर्डमधील काही भाग सील करण्यात आला. पुणे, पिंपरी-चिंचवडमधून काही नागरिक रात्री देहुरोड आणि मावळमध्ये प्रवेश करीत आहेत. संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. देहुरोडमधील शिवाजीनगर, राजीव गांधी नगर तसेच आजुबाजुच्या काही परिसराचा यात समावेश आहे. त्यामुळे सील केलेल्या भागातील नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळुन प्रशासनाला सहकार्य करावे. परिसरातील अन्य भागात संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करुन प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी आता जागरुक राहुन काळजी घ्यावी… अशी सादही घातली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागात राहून आलेल्या दोन लहान मुलींचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे या भागात देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षण करून तेथील ‘हायरिस्क’ आणि ‘लो रिस्क’मधील व्यक्तींना क्वारंटाइन कारण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली आहे. सविस्तर वाचा
भाजीच्या टेम्पोतून ‘ते’कुटुंब देहूरोडमध्ये आले…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूरोडच्या शिवाजीनगर झोपडपट्टीत कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण सुरु होते. पुण्यातील येरवडा, लक्ष्मीनगर या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागातून भाजीच्या टेम्पोत बसून सोमवारी ( दि. 27) शिवाजीनगर येथील एका कुटुंबात काही व्यक्ती आल्याचे आढळून आले. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या वैद्यकीय पथकाने त्यांना तात्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज (बुधवारी) या कुटुंबातील दोन मुलींचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यामुळे मावळ तालुक्यात पहिल्यांदा दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
मावळ तालुक्यात एकही रुग्ण नाही पण…
मावळात कोरोनाचा अद्यापही एकही रुग्ण सापडला नसून, देहूरोड येथे रुग्ण सापडल्याने मावळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देहूरोड येथील शिवाजीनगर परिसर सील केला असून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती व नातेवाईकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड येथील शिवाजीनगर परिसरातील एक पाच वर्षे व दुसरी 11 वर्षे वयाची मुलगी येरवडा पुणे येथे नातेवाईकांकडे मागील ३ आठवड्यांपूर्वी गेली होती. त्या मुलीच्या कुटुंबाची तपासणी सोमवारी (दि.27) केली. त्यात संशय आल्याने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता, त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य वायसीएम रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये आहेत.
देहुरोडमध्ये ३ मेपर्यंत कडकडीत लॉकडाउन : मुख्य कार्यकारी अधिकारी
देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३० एप्रिल ते ३ मेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ मेडिकल, हॉस्पिटल आणि दूध विक्री वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, अशी माहिती देहूरोड कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी दिली.
कोरोनाविरोधातील ही लढाई आम्ही जिंकणार : आमदार सुनील शेळके
मावळच्या नागरिकांनी गेले ४५ दिवस कोरोनाविरोधातील लढाई यशस्वी ठेवली. पुणे-मुंबई महानगरांच्या मध्ये असलेल्या मावळ तालुक्यात अद्यापही कोरोना रुग्ण सापडलेला नाही, पण देहूरोड परिसरात रुग्ण सापडल्याने मावळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता चिंता करुन किंवा घाबरुन चालणार नाही. नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी घरातच रहावे, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखा. ही लढाई आपण जिंकणार आहोत, शासनाचे नियम काटेकोर पणे पालन करा, अशी भावनिक साद आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांना घातली आहे.