#CoronaVirus: मुंबईत कोरोना रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी- आरोग्यमंत्री राजेश टोपे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/rajesh-tope-1.jpg)
मुंबईमधील लिलावती रुग्णालयात करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यात यश मिळालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
राजेश टोपे यांनी सांगितलं की, “लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे”.