#Waragainstcorona: कोरोनाविरुद्धच्या लढाईत आमदार सुनील शेळकेंसोबत कलाकारही मैदानात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/4-16.jpg)
– तळेगाव दाभाडे परिसरात रंगावलीच्या माध्यमातून जनजागृती
– पेंटर रामदास घोडेकर यांच्या संकल्पनेतून साकारली ठिकठिकाणी रंगावली
मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात मोठा ‘मदत नव्हे कर्तव्य’उपक्रम, अन्न छत्रालय, मोफत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप, आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी साहित्य खरेदी असे विविध लक्षवेधी उपक्रम हाती घेतलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सोबतीला आता परिसरातील कलाकारही मैदानात उतरले आहेत.
मावळात अद्याप कोरोनाने शिरकाव केलेला नाही. मात्र, प्रशासनाला साथ द्यायची…आणि कोरोनाला हद्दपार ठेवायचे…असा संकल्प आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. ‘सोशल डिस्टंसिंग’हा कोरोनाला हारवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील रंगावली कलावंतांनी स्वयंस्फूर्तीने ठिकठिकाणी रंगावली साकारुन नागरिकांचे लक्ष वेधले आहे. त्याद्वारे सोशल डिस्टंसिंगचा संदेश देण्यात येत आहे.
रंगावलीची संकल्पना तळेगावमधील प्रसिद्ध पेंटर रामदास घोडेकर यांची आहे.त्यांना राजेश घोडेकर यांचे सहकार्य होत आहे. स्वखर्चाने रंगावली साकारली जातेय कारण, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपआपल्या परिने कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुढाकार घेत आहे. या लढाईत आमचा खारीचा वाटा असावा, अशी भूमिका आहे, असे मत घोडेकर यांनी व्यक्त केले.
तळेगावातील लिंब फाटा चौक, मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी रंगावली साकारण्यात आली आहे. कोरोना संदर्भातील खबरदारी आणि काळजी घेण्याबाबत जनजागृतीपर संदेश चितारले जात आहेत. अफवा पसरवू नका,विनाकारण प्रवास टाळा, घरातच रहा सुरक्षित रहा,कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घ्या असे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासन जबाबदारी घेऊन तळेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/c1469392-9ea7-4ed1-afc8-3df4e6ef6c3f-1024x768.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/28067f99-4b8c-4f52-bcc9-bfa8f691bec9-1024x768.jpg)