निपाह व्हायरससोबत राहुल गांधींची भाजप नेत्याकडून तुलना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rahul1-6-ooo.jpg)
नवी दिल्ली: भाजप नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करतना विज यांची जीभ जरा अधिकच घसरली आहे. अनिल विज यांनी राहुल गांधी यांना थेट निपाह व्हायरसची उपमा दिली आहे. राहुल गांधी हे निपाह व्हायरसप्रमाणे असून जो त्यांच्या संपर्कात येतो तो संपुष्टात येतो, असे विज यांनी म्हटले आहे. विजय यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते जोरदार चर्चेत आले असून, सोशल मीडियावरही ते टीकेचे धनी झाले आहेत.
विज यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर टीका केली आहे. निपाह व्हायरसची राहुल गांधींना उपमा देणारे हे ट्विट विज यांनी दोन दिवसांपूर्वी केले आहे. मात्र, गेल्या काही तासांत ते ट्विट जोरदार व्हायरल झाले. विज यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याला कर्नाटक विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. गेल्याच आठवड्यात कर्नाटकमध्ये काँग्रेसने जेडीएसच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. त्यावरून विज यांनी ही टीका केली आहे. दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सध्या विदेशात आहेत.