#CoronaVirus: कोरोनाबद्दलच्या या सात अफवांवर विश्वास ठेऊ नये- शरद पवार
![Fertilizer prices restored after Sharad Pawar's demand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Sharad-Pawar-18.jpg)
करोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता सर्वसामान्यांच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. करोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी देशभरात लॉकाडाउन करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र सध्या नागरिकांच्या मनात करोनासंबंधी अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांनी करोनाविषयी तथ्य व गैरसमजांसंदर्भात माहिती प्रकाशित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी ही आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केली आहे. यावेळी त्यांनी करोना विरोधातील लढाई ही अफवा व गैरसमजांविरोधातही लढावी लागणार आहे. ती बारकाईने वाचणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
जाणून घेऊयात करोनासंबंधी तथ्य आणि गैरसमज –
विधान – उन्हाळा आल्याने करोना विषाणू रोखण्यास मदत मिळेल
तथ्य – करोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या सर्व क्षेत्रात पसरु शकतो. कोविड-१९ पासून स्वत:चे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण आणि पाणी वापरुन स्वच्छ धुणे. खोकताना आणि शिंकताना नाकावर रुमान धरणे आणि गर्दीची ठिकाणे टाळणे.
विधान – गरम पाण्याने आंघोळ केल्याने नवीन करोना विषाणू आजार रोखता येईल
तथ्य – आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस एवढे असते. या तापमानात हे विषाणू आपल्या शरिरात संचार करु शकतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यावर काही परिणाम होणार नाही.
विधान – कच्चे लसूण, तीळ खाल्ल्याने विषाणूपासून बचाव होईल
तथ्य – लसूण हा आरोग्यदायी पदार्थ आहे. त्याचे असे अनेक फायदे आहेत. पण लसूण खाल्ल्याने लोकांना नवीन करोना विषाणूपासून संरक्षण मिळत नाही.
विधान – न्यूमोनियाविरोधात वापरण्यात येणारी लस नवीन करोना विषाणूपासून आपले रक्षण करेल
तथ्य – न्यूमोनियाविरोधात देण्यात येणारी लस तुमचे न्यूमोनियाविरोधात नक्कीच संरक्षण करील. परंतू न्यूमोनियाविरोधात देण्यात येणाऱ्या लसीमध्ये नोवल करोना विषाणूविरोधात लढण्याची क्षमता नाही.
विधान – डासांच्या दंशाद्वारे करोनाची बाधा होऊ शकते
तथ्य – करोना विषाणू डासांच्या द्वंशाद्वारे पसरु शकत नाही. तो प्रामुख्याने बाधित व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून किंवा लाळेच्या थेंबातून किंवा नाकातील स्त्रावाद्वारे पसरतो.
विधान – आपल्या संपूर्ण शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरीनवर आधारित द्रव लावल्याने करोना विषाणूला रोखता येऊ शकते.
तथ्य – आपल्या संपूर्ण शरीरावर/कपड्यांवर अल्कोहोल किंवा क्लोरीनवर आधारित द्रव लावणे किंवा मद्यपान करणे आपल्याला करोना विषाणूची बाधा होण्यापासून वाचवू शकत नाही. नाक किंवा तोडावाटे विषाणू आपल्या शरीरात जेव्हा शिरकाव करतात तेव्हा आजार पसरला जातो. जेव्हा आपण दूषित हाताने तोंडाला स्पर्श करतो किंवा अन्न खातो तेव्हा बाधा होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच वारंवार आपले हात साबण व पाणी वापरुन स्वच्छ धुवा, जेणेकरुन आपण विषाणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू शकतो.
कोरोना विरोधातली लढाई ही अफवा व गैरसमजांविरोधातही लढावी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांनी कोरोनाविषयी तथ्य व गैरसमजांसंदर्भात माहिती प्रकाशित केली आहे. ती बारकाईने वाचणे आवश्यक आहे.#LetsFightCorona #StayHomeStaySafe pic.twitter.com/g6Z3WQcNXt
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 30, 2020
विधान – मिठाच्या द्रावाने (सलाईन) नियमितपणे नाक साफ केल्यास संसर्ग टाळता येईल
तथ्य – नाक सलाईनद्वारे सातत्याने साफ केल्यास सर्दी लवकर बरी होण्यास मदत मिळते असे काही प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. पण करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल असा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.