राज्यातील महामार्गांवर उभारण्यात येणार १६० ठिकाणी स्वच्छतागृहे
मुंबई : राज्यातील महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची कुचंबणा लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.
या स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपवरही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने वर्षा पवार-तावडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांची भेट घेऊन, या प्रश्नावर चर्चा केली. राज्यातील प्रमुख महामार्गांवर स्वच्छतागृहांची उभारणी करावी, या मागणीसह महिला प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सुविधांच्या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने पाटील यांना दिले.
महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये महिला प्रवाशांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडिंग मशिन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा यात समावेश होता. ही मागणी मान्य करून महामार्गांवरील स्वच्छतागृहांमध्ये याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.