नवजात चिमुकलीसाठी ‘त्याने’ रोजाचा केला त्याग
दरभंगा : बिहारच्या दरभंगामधील एका तरूणाने माणुसकी जपण्याचे काम केल्याने सध्या सगळीकडूनचा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दोन दिवसांच्या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी या तरूणाने रोजा सोडला. नवजात चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी तिला रक्त देणे गरजेचे होते म्हणून तिला रक्त देण्यासाठी त्याने रोजा तोडला.
रमेश सिंह या जवानाला दोन दिवसांपूर्वी मुलगी झाली. पण मुलगी जन्माला आल्यावर तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलीला रक्ताची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी मोहम्मद अशफाक रक्तदान करायला तयार झाला. पण काही न खाता रक्तदान करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी काहीतरी खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिला.
रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने अशफाकनेही रोजा ठेवला होता. पण मुलीचा जीव वाचवणे त्याला योग्य वाटल्याने त्याने रोजा सोडून रक्तदान केले. ‘एखाद्याचा जीव वाचवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सुरक्षा रक्षकाची ती मुलगी आहे यामुळेच मला प्रेरणा मिळाली’, असे अशफाकने म्हटले.