धक्कादायक, बँक मॅनेजरने होम क्वॉरांटाइन महिलेला बोलावलं कामावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/WhatsApp-Image-2020-03-23-at-8.44.11-AM.jpeg)
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार पूर्ण खबरदारी घेत असताना काही अधिकारी मात्र सरकारच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचं दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे होम क्वॉरांटाइन असलेल्या महिला कर्मचाऱ्यास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने कामावर बोलवल्याने एकच खळबळ उडाली.
नुकतीच पुणे येथून एका महिलेची मोर्शीच्या स्टेट बँक शाखेत बदली झाली. सदर महिला मोर्शी इथं जॉइन झाली,तेव्हाच तिने शाखा व्यवस्थापक यांना पुणे येथून आपल्या हातावर होम क्वॉरांटाइनचा शिक्का असल्याने आपल्याला घरीच राहायला सांगितल्याची कल्पना दिली.
मात्र, तरीही मोर्शी येथील शाखा व्यवस्थापक यांनी मार्च अखेरीचे काम असल्याचं सांगून सदर महिलेला बँकेत कामासाठी बोलवलं. सदर महिला बँकेत काम सुद्धा करत होती. बँकेत येणाऱ्या काही जागृत ग्राहकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी बँक मॅनेजरची चांगलीच खरडपट्टी काढली.
मोर्शीच्या तहसीलदार यांच्याकडे सदर घटनेची तक्रार केल्यानंतर सर्वच कर्मचारी अधिकाऱ्यांना तातडीने शासकीय रुग्णलयांमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. तातडीने स्टेट बँकेचं निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
एकीकडे देशाचे पंतप्रधान कर्मचारी कमी करा,कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापू नये. सुटी द्या असं आवाहन करत असले तरी मात्र, मोर्शी शाखा व्यवस्थापक यांनी सरकारचा सल्ला गांभीर्याने घेतला नसल्याचं दिसत आहे. आता या शाखा व्यवस्थापक यांच्यावर सरकार काय कारवाई करणार याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे.