इराणमधील तीनशे भारतीयांचे नमुने तपासणीसाठी आणणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/coronavirus_FB_5e2d3e0426fc8.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
इराणमध्ये भारताचे अनेक नागरिक अडकलेले असून त्यांना परत आणण्यासाठी तेथील सरकारशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्यातील तीनशे भारतीयांचे नमुने तपासणीसाठी घेऊन इराणचे एक विमान भारताकडे रवाना होत आहे. इराणच्या महान एअरचे हे विमान असून त्यात इतर कुणीही प्रवासी नसतील. पण सध्या भारतात जे इराणी लोक आहेत त्यांना जाताना हे विमान मायदेशी घेऊन जाणार आहे. इराणमध्ये एकूण २ हजार भारतीय असून त्या देशात करोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला आहे.
हवाई वाहतूक सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी शुक्रवारी सांगितले,की भारतीयांचे नमुने घेऊन इराणचे विमान रवाना होत आहे. रोजच्या रोज तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून भारतीयांना मायदेशी आणले जाईल. त्याआधी ते तंदुरूस्त असल्याची खात्री करण्यात येईल. भारत सरकार इराणमध्ये भारतीयांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्रालयाने म्हटले होते, त्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा एक व आयसीएमआरचे तीन संशोधक तेथे पाठवण्यात आले आहेत. याला आणखी एक पर्याय म्हणून तेथील भारतीयांचे नमुने गोळा करून ते इराणच्या विमानाने येथे आणले जाऊ शकतात. त्यांची तपासणी भारतात एक दिवसात करून निष्कर्ष जाहीर केले जातील. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले,की महान एअरच्या विमानाने ३०० नमुने आणले जाणार असून ज्यांची चाचणी नकारात्मक येईल त्यांना भारतात आणले जाईल. अनेक भारतीय इराणमध्ये तीर्थयात्रेला गेले आहे. गेल्या महिन्यात इराणला जाणारी विमाने भारताने रद्द केली होती. दिल्ली व मुंबई दरम्यान इराणची आठवडय़ाला तीन उड्डाणे सुरू आहेत. भारताने आतापर्यंत चीन व जपानमधून अनेक भारतीयांना माघारी आणले आहे.