किम जोंग आणि मून जे इन यांची भेट
- जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसंदर्भात सकारात्मक चर्चा
सेऊल – दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात दोन्ही देशांदरम्यानच्या लष्करशून्य भागात आज भेट झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांच्याबरोबरची परिषद अद्यापही होऊ शकते, असे काल म्हटले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही कोरियाच्या अध्यक्षांची भेट झाली असल्याचे दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या “ब्लू हाऊस’ या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. युद्धविरामक्षेत्र असलेल्या पॅनमुनजोम या गावात दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. याच ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या महिन्यातही चर्चा झाली होती आणि येथूनच आपापसातील संबंध सुधारण्याची घोषणाही दोन्ही नेत्यांनी केली होती.
दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाण घेवाण केली आणि पॅनमुनजोम जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीच्या पर्यायांवर चर्चा केली. तसेच अमेरिका आणि उत्तर कोरिया परिषदेच्या यशस्वीतेबाबतही चर्चा झाली, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. यासंदर्भात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून उद्या स्वतंत्र निवेदन प्रसिद्धीस देणार आहेत.
गुरुवारी ट्रम्प यांनी किम यांच्याबरोबर 12 जूनला सिंगापूरमध्ये होणारी परिषद रद्द केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी ही परिषद उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यासच होऊ शकते, असे स्पष्ट केले.