Bike Thief: पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरट्यांचा उच्छाद; पोलिस प्रशासनाला आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/3-3.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगर परिसरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विविध ठिकाणी दुचाकीचोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांसह पोलिस प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.
भोसरी, वाकड, तळेगाव दाभाडे आणि हिंजवडी परिसरातून चार वाहनांची चोरी झाली आहे. याबाबत मंगळवारी (दि. 3) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. अमोल राजेंद्र नवले (वय 26, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवले यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एम एच 17 / बी ई 6370 ही दुचाकी अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी भोसरी सहल केंद्रासमोर पार्क केली. अज्ञात चोरटयांनी भर दिवसा दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी घटना मातोश्री कॉलनी, थेरगाव येथे घडली. जयपाल नारायण चव्हाण (वय 30, रा. मातोश्री कॉलनी, थेरगाव, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांनी 23 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 14 / सी ए 9605 ही दुचाकी घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
तिसरी घटना परंदवडी येथे 25 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. धर्मेंद्र रामस्वरूप राठोड (वय 38, रा. परंदवडी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ डब्ल्यू 8854 ही दुचाकी परंदवडी येथील पूनम किराणा दुकानाच्या विरुद्ध बाजूला पार्क केली. किराणा दुकानात सिगारेट आणण्यासाठी जाताना त्यांनी चावी दुचाकीलाच ठेवली. दुकानातून सिगारेट घेऊन येईपर्यंत चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
चौथी घटना पवना बँकेसमोर मारुंजी येथे घडली. विकास मोहन जगताप (वय 36, रा. पवना बँकेसमोर, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची बुलेट (एम एच 14 / ई जी 5051) 1 मार्च रोजी रात्री अकरा वाजता राहत्या घराच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी बुलेट चोरून नेली. 2 मार्च रोजी दुपारी चार वाजता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
****
पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह…
बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील स्वतंत्र पोलिस आयुक्तालयामुळे शहरात कायदा-सुव्यवस्था निर्माण होईल. गुन्हेगारी घटनांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांतील गुन्हेगारी घटना पाहता पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.