RAPE CASE : ‘बर्ड व्हॅली’ उद्यानात आठ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर झाला अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/bIRD-VALLY.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील संभाजीनगरमधील ”बर्ड व्हॅली” उद्यानात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असा गंभीर प्रकार याठिकाणी घडत असताना महापालिका प्रशासनाने नेमलेल्या सुरक्षायंत्रनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार अत्यांत गंभीर असून समाजातून महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. संबंधीत अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गरोदर असून यातील आरोपी अटकेत आहे. व्यंकटेश जगदाळे (वय 20, रा. विद्यानगर, चिंचवड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक भा. द. वी. कलम 376 (2) (आय) (जे) (एन), पोस्को 2012 चे कलम 5 (जे) (2) (एल) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश जगदाळे याने संबंधीत अल्पवयीन मलीसोबत मैत्रीपूर्ण संबंधी बनवले. त्याचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर ते दोघेही चिंचवडच्या संभाजीनगरमधील महापालिकेच्या बर्ड व्हॅली उद्यानात फिरायला जायचे. व्यंकटेशने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत शरिरसंबंध प्रस्थापित केले. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दोघांमध्ये हे वारंवार घडत गेले. यातून मुलगी पाच महन्यांची गरोदर राहिली. याबाबत आईला संशय आल्याने तिच्याकडे विचारणा झाली. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर मुलीच्या आईने व्यंकटेशच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली.
हा अत्याचाराचा प्रकार ज्याठिकाणी घडला ते बर्ड व्हॅली उद्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आहे. हे उद्यान दिवसभर आणि सायंकाळी निर्धारित वेळेपर्यंत नागरिकांसाठी खुले असते. त्यामुळे याठिकाणी सर्व वयोगटातील व्यक्ती फिरायला येत असतात. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून याठिकाणी हा प्रकार खुलेआम घडत असताना उद्यानाची सुरक्षा यंत्रणा काय करत होती, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. असे प्रकार घडण्यास उद्यानातील जागा अनुकूल असल्यानेच अशा संधीचा फायदा घेऊन याठिकाणी असे कृत्य केले जात आहे. हा प्रकार घडण्याला पालिका प्रशासन आणि उद्यानाची सुरक्षायंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप समाजातून होत आहे.
संबंधीत तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे या प्रकरणाच्या सखोल चौकशी केली जात आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. खरा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे.
प्रकाश आरदवाड, सहायक पोलीस निरीक्षक