सोलापूर पोटनिवडणूक काँग्रेसचा उमेदवारच लढवेल: अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-174.png)
सोलापूर | महाईन्यूज |
‘जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जागेवर पोटनिवडणूक लढवली जाणार आहे. या जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल.’, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला आहे.
महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आताच तयारीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘सोलापूरची ही जागा पूर्वी काँग्रेसने लढवली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावे लागेल. त्यांचे एकमत झाले तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल.’, असे अजित पवार यांनी सांगितले.