कर्म आणि अहंकारामुळे फडणवीसांना न्यायालयात हजर रहावं लागलं
नागपूर | महाईन्यूज
2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अखेर आज न्यायालयात हजर रहावे लागले. नागपुरातील JMFC न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना 15 हजाराच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
याप्रकरणी फडणवीसांकडून ज्येष्ठ विधीज्ञ सुनील मनोहर यांनी तर त्याविरोधात वकील सतीश उके यांनी आपापली बाजू मांडली. फडणवीस यांनी कोर्टाबाहेर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. यामागे नेमकं कोण आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे, असं फडणवीस म्हणाले. त्याबाबत विरोधी वकील सतीश उके यांना विचारलं असता, ते म्हणाले, “असं कोणी कोणाच्या मागे नसतं. त्यांची कर्म त्यांच्यासाठी दोषी आहेत. त्यांच्या हरकती दोषी आहेत. त्यांचा अहंकार दोषी आहे. कोणीही राजकीय हात यामागे नाही”.
“फडणवीसांनी आज कोर्टात हजर राहून जामीनासाठी अर्ज केला. मात्र, आम्ही जामीनाला विरोध केला. अरविंद केजरीवालांना अशाच गुन्ह्यामध्ये जेलची हवा खावी लागली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नातेवाईकाला कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात 15 हजारांची रक्कम भरावी लागली. त्यामुळे या खटल्यात फडणवीसांना झुकतं माफ मिळू नये. कायद्याचं तत्व आहे, कलम 14 प्रमाणे समानतेने न्याय व्हावा. त्यावर कोर्टाने म्हटलं की आम्ही त्यांचा 15 हजाराचा बॉण्ड मागतोय. ते जर पुढील तारखांना आले नाहीत, त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांच्याकडून ते वसूल करु. जामीन मिळाला असला तरी हा फडणवीसांना दिलासा नाही. आजपासून हा खटला सुरु झाला आहे. पुढची तारीख 30 मार्च असून, तेव्हापासून दोषारोप निश्चित केले जातील. त्यांना प्रत्येक तारखेला यावं लागेल”, अशी माहिती सतीश उके यांनी दिली.