तब्बल 6 महिने अल्पवयीन मुलीवर झाला अत्याचार, 10 जणांची नावे उघडकीस

सोलापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी
एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सुमारे ६ महिन्यांपासून तब्बल १० जणांकडून सामूहिक बलात्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (दि. 11) मुलगी एका मंदिराच्या समोर रडत असल्याचे दिसून आल्यानंतर लोकांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावर तिने तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगताच सर्वांना धक्का बसला. नागरिकांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर या घटनेच्या खोलातील वास्तव उघडकीस आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर येथील विजापूर रस्त्यावरील एका मंदिरासमोर एक मुलगी रडत बसली होती. स्थानिक नागरिकांचे मुलीकडे लक्ष गेल्याने त्यांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केली. तिने सांगितलेला प्रकार धक्कादायक वाटल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी जाऊन मुलीला ताब्यात घेतले. तिचे मनोधैर्य वाढवून तिच्याकडे घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. मुलीने आजपर्यंत घडलेला सर्व प्रकार सांगितला. ओळख असलेल्या तरुणांची नावे देखील तिने सांगितली. यात 10 आरोपींची नावे असल्याने त्यापैकी पाचजणांना विजापूर नाका पोलिसांनी तत्काळ अटक केली. अन्य पाचजणांचा शोध सुरू असून यापैकी बहुतांश तरुण हे रिक्षाचालक आहेत.
पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदविला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, आरोपींपैकी काहीजणांना ती आधीपासूनच ओळखते. याच लोकांनी सुरुवातीला तिच्यावर अत्याचार केला. याची वाच्यता केली तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही त्यांनी दिली. त्यानंतर अन्य आरोपी देखील या गुन्ह्यात सामील झाले. त्यांनी सलग ६ महिने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. पोलिस तपासात काही आरोपी ऑटो रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरपल्याने मुलगी आईसोबत राहत आहे. कुटुंबातील जबाबदार व्यक्ती गेल्याने घराची संपूर्ण जबाबदारी आईवर आल्याने अनेकदा कामानिमित्त आई बाहेर असते. आई अनुपस्थित असल्याचा गैरफायदा घेऊन ओळखीतील आरोपींनी तिला भुलवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अन्य आरोपींनी देखील तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यापैकी पाचजणांच्या पोलिसांनी मुसकी आवळल्या आहेत. अन्य पाच फरार आहेत, पोलिस त्यांच्या मागावर आहेत.




