आकुर्डीच्या अप्पर तहसिल कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/6-4.jpg)
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन; सचिन काळभोर यांची तक्रार
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड अप्पर तहसिल कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात सर्वसामान्य नागरिकांची लूट होवू लागली आहे. तहसिल कार्यालयात एजंटाचा वावर वाढल्याने विविध दाखले अन्य कामांसाठी येणा-यांची आर्थिक पिळवणूक होवू लागली आहे. त्याकडे अप्पल तहसिलदारांचे दुर्लक्ष झाले आहे.
याबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नवनगर विकास प्राधिकरण इमारतीच्या तळमजल्यावर नागरी सुविधा केंद्र आहे. त्या केंद्रात खासगी एजंटानी मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, नाॅन क्रिमिनल दाखला, जातीचा दाखला, इतर आॅनलाईन कागदपत्रे एजंट 10 ते 15 हजार रुपये घेवून बनवून देतात.
सदरील नागरी सुविधा केंद्र मुळ संस्थाचालक यांनी भाडे इतर इसमांना दिले आहे. अन्य व्यक्ती नागरी सुविधा केंद्र चालवू लागल्याने अबाल वृध्दासह महिला वर्ग, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे.दाखले लवकर देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले जात आहेत. याबाबत अप्पल तहसिलदार गिता गायकवाड यांना तक्रार दिली होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परंतू, सदरील नागरी सुविधा केंद्र चालक, जे.एम.के इन्फ्रो कंपनीचे व्यवस्थापक यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे संबंधित चालकांवर कोणतीही कारवाई होत नाही.
दरम्यान, त्या नागरी सुविधा केंद्रात सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, संबंधित केंद्र चालक व अन्य एजंटावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे सचिन काळभोर यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली आहे.