महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत: मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Udhav-Thakarey-1.jpg)
मुंबई | राज्यात महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसंच, हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळल्याच्या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही सूचना दिली आहे.
हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची प्रकृती नाजूक आहे. तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. पीडित तरुणीच्या उपचारासाठी त्यांनी ४ लाखांची मदत दिली. प्रसिध्द सरकार वकील उज्वल निकम या प्रकरणाचा खटला चालवतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
त्याचसोबत महिलेच्या सुरक्षेबाबत कडक कायदा करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी प्राध्यापक असणारी २४ वर्षीय पीडित तरुणी कामासाठी निघाली होती. हिंगणघाटच्या नंदोरी चौकामध्ये ती बसमधून उतरली. त्याठिकाणावरुन ती महाविद्यालयाकडे चालत जात होती. त्याचवेळी आरोपीने पीडित तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.
गंभीर जखमी तरुणीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला नागपूर येथून अटक केली. आरोपी पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.