जामियात पोलिसांसमोर तरुणाचा निषेध मोर्चावर गोळीबार, विद्यार्थी जखमी; घटनेवेळी ‘ये लो आजादी’च्या दिल्या घोषणा
नवी दिल्ली | महाईन्यूज
नागरिकत्व दुरुस्ती कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चापूर्वी गुरुवारी जामिया विद्यापीठात एका तरुणाने गोळीबार केला. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. तरुणाने 12 पोलिस कर्मचाऱ्यांसमोर बराच वेळ हवेत बंदुक फिरवली आणि गोळीबार केला आहे. यावेळी तरुणाने गोळीबार करताना ‘ये लो आजादी’च्या घोषणा दिल्या. या गोळीबारात जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी एम्स ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
आरोपी ग्रेटर नोएडाच्या जेवर भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने गोळीबार करण्यापूर्वी रामभक्त गोपाल नावाच्या फेसबुक प्रोफाइलवरून फेसबुक लाईव्ह केले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहेत.
- जामिया ते राजघाटपर्यंत काढण्यात येणार होता मोर्चा
गुरुवारी जामिया समन्वय समितीने(जेसीसी) सीएए आणि एनआरसीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. हा मोर्चा जामिया ते राजघाटपर्यंत काढण्यात येणार होता. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडली आहे.