नितीन गडकरी धडाकेबाज मंत्री

- उमा भारती – स्मृती इराणी यांचे काम असमाधानकारक
नवी दिल्ली – पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाच्या आधारावर तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये नितीन गडकरी यांना सर्वाधिक गुण देण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील धडाकेबाज मंत्री म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे बघितले जावू लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारला पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीस सामोरे जायचे आहे. अशात पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांच्या कामकाजाच्या आधारावर रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये नितीन गडकरी यांना सर्वाधिक 7 गुण देण्यात आले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग दुसया स्थानी आहेत. यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तर संरक्षण मंत्री निर्मला सितारामन या पाचव्या स्थानी आहेत. सुषमा स्वराज या ट्वीटच्या माध्यमातून नेहमी लोकांच्या समस्या सोडविताना दिसतात. सर्वोत्तम कामकाज असलेल्या टॉप पाच मंत्र्यांच्या यादीत दोन महिला आहेत, हे येथे उल्लेखनीय.
पेजयल मंत्रालयाच्या मंत्री उमा भारती यांचे सर्वात वाईट असल्याचेही या रिपोर्ट कार्डमध्ये नमूद करण्यात आले आहे. उमा भारती यांच्याकडे आधी जल संसाधन आणि गंगा पुनरूध्दार हेही खाते होते. आता हे मंत्रालय गडकरी यांच्याकडे देण्यात आले आहेत. वादग्रस्त विधाणांमुळे नेहमी चर्चेत राहणारे मंत्री गिरीराज सिंग दुसया क्रमांकावर आहेत. तर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा क्रमांक तिसरा आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार स्मृती इराणी यांच्याकडून दोनवेळा काढून घेण्यात आला होता, हे विशेष.





