Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या पैलवानाचे तगडे आव्हान, राष्ट्रवादीतून कोण दंड थोपटणार ?

  • आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात कोण समोर येणार ?
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लागले लक्ष

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला गेला असला तरी आता हा गड भाजपच्या ताब्यातून सोडवून घेणे एवढे सोपे राहिलेले नाही. कारण, शहरावरची भाजपची पकड आणखीन मजबूत करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्यावर पक्षाने शहराध्यक्ष पदाची धुरा दिली आहे. आमदार लांडगेंचा प्रभाव रोखण्यासाठी तोडीसतोड, स्वच्छ प्रतिमा आणि हुशार व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद द्यावे लागणार आहे. ही संधी भोसरीला दिली जाणार की चिंचवडला, हे गुलदस्त्यात असले तरी भाजप आमदार लांडगे यांचे आव्हान राष्ट्रवादी कसे रोखणार, हा खरा प्रश्न आहे.

पिंपरी-चिंचवडवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मजबूत पकड असताना माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपने सत्ता मिळवली. त्यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निर्भिड व्यक्तीमत्वाचा आणि धाडसी कर्तृत्वाचा कस लागला. मात्र, दुर्दैवाने भाजपला बहुमताअभावी राज्यातून सत्ता गमवावी लागली. परिणामी, शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याचे दिसते. परंतु, जनमानसाच्या मनावर असलेली भाजपची पकड आजही मजबूत दिसते. सत्ताकाळात कार्यकर्त्यांनी केलेली सदस्य नोंदणी, बुथप्रमुखांनी पूर्ण केलेले पक्षकामाचे टार्गेट, कार्यकर्त्यांचे झालेले मेळावे, यामुळे भाजप तळागाळात पोहोचलाय. ही पकड कायम ठेवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांना भाजपने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात बहुभाषीक वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. चिंचवड, वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख भागात राहणारा बहुभाषीक वर्ग अत्यंत सुशिक्षीत मानला जातो. त्यांच्यावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच प्रभाव कायम दिसतो. स्थानिक पक्षाच्या नेत्यांचे महान कार्य त्यांच्या मनावर रुजविता रुजणार नाही, अशा परिस्थितीचा सांगोपांग विचार करूनच पक्षश्रेष्ठींनी भाजप शहराध्यक्ष पद चिंचवडला कायम न ठेवता भोसरीला दिले. त्यामुळे भोसरी आता शहराचे राजकीय केंद्रस्थान बनत चालले आहे. कारण, या भागातील मराठी वर्गाची मोठ बांधण्यासाठी आमदार लांडगे यांना ही जबाबदारी दिली आहे. दिघी, च-होली, वडमुखवाडी, मोशी, कुदळवाडी, चिखली, आळंदी आणि आळंदीच्या पुढील ग्रामीण पट्ट्यातील मराठी वर्गाला भाजपशी जोडण्यासाठी आमदार लांडगे यांचे व्यक्तीमत्व निश्चितच कामयाबी ठरेल. उर्वरीत झोपडपट्टी भागातील मतदारांना कसे ग्रहीत धरले जाते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजपची ही रणनिती असताना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीला शहराध्यक्ष पदावर कणखर बाणा, सडेतोड वक्तृत्व आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तीला संधी द्यावी लागणार आहे. तरच, लांडगे यांचे आव्हान रोखणे राष्ट्रवादीला शक्य होणार आहे.

कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार का ?

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीची मोठमोठी पदे भोगलेल्या व्यक्तींना पक्षवाढीच्या दृष्टीने उदासिनता आल्याचे दिसते. महापालिकेत भाजपची सत्ता असताना चुकीच्या कामांना परखडपणे विरोध करणे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना जमले नाही. काहींनी भाजपशी सोयीस्करपणे हातमिळवणी करून तीन वर्षाच्या कार्यकाळात कसलाही हस्तक्षेप केला नाही. जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनीच पदाचे गांभीर्य ठेवून काम न केल्यामुळे त्याचा परिणाम लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादीचे वातावरण संपुष्टात आल्याचे मानूनच भाजपने शिरूर लोकसभा डोळ्यासमोर ठेवून शहराला नेतृत्व दिल्याचे दिसते. शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षाकडून आता तरी शहराध्यक्ष बदलणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण, विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपलेला असताना त्यांच्याजागी कर्तव्यनिष्ठ व्यक्तीची निवड होणे गरजचे आहे. त्यातच शहराध्यक्ष पदासाठी भोसरी की चिंचवड हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे, असे एकंदरीत वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button