किंगमेकर नव्हे; कुमारस्वामी ठरले किंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/kumarswami-wife-1.jpg)
बंगळूर – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी हे मी किंगमेकर नव्हे; तर किंग ठरेल, असा ठाम विश्वास बोलून दाखवत होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने 58 वर्षीय कुमारस्वामी यांना वाटणारा विश्वास खरा ठरला आहे.
संख्याबळाच्या दृष्टीने जेडीएस तिसऱ्या स्थानावर फेकला जाऊनही वोक्कलिगा समाजाचे नेते असणाऱ्या कुमारस्वामी यांनी राजमुकूूट परिधान केला आहे. माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांचे तृतीय चिरंजीव असणाऱ्या कुमारस्वामी यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. कुमाराण्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुमारस्वामी यांनी याआधी 2006-07 मध्ये 20 महिन्यांच्या कालावधीसाठी जेडीएस-भाजप युती सरकारचे नेतृत्व केले. यावेळी कर्नाटकच्या सत्तेसाठी प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांमध्येच लढत होती.
दोन्ही पक्षांपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर सत्ताधारी ठरवणारा जेडीएस किंगमेकर बनेल, अशीच चर्चा होती. या चर्चेला अनुसरूनच निकाल लागला. मात्र, सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने सरकार स्थापनेसाठी जेडीएसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कुमारस्वामी यांना राजकीय जॅकपॉट लागला.
आता मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारली असली तरी आघाडी सरकार चालवण्याचे मोठेच आव्हान कुमारस्वामी यांच्यापुढे आहे. जेडीएसपेक्षा (37) मित्रपक्ष कॉंग्रेसचे (78) संख्याबळ दुप्पट आहे. त्यामुळे सरकारच्या कामकाजातील कॉंग्रेसचा वरचष्मा कुमारस्वामी यांना सहन करावा लागेल. याशिवाय, लक्षणीय संख्याबळ असणारा भाजप (104) विरोधी पक्ष म्हणून सरकारपुढे मोठे आव्हान उभे करू शकतो. सत्तेचा घास हिरावला गेल्याने भाजप अधिक आक्रमक पवित्र्यात वावरण्याची शक्यता आहे.