कळवा मेडिकलमधील हत्याकांडाची वीस दिवसांनी उकल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Police.jpg)
मुंबई | कळव्यातील मेडिकलमध्ये प्रेमसिंग राजपुरोहित या तरुणाची गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने नाशिकमधूनच अटक केली असून वीस दिवसानंतर या हत्याकांडाची उकल झाली. सर्फराज हरून अन्सारी (२६) असे या आरोपीचे नाव असून मूळचा झारखंडचा आहे.
कळवा पूर्वेकडील वीर युवराज मेडिकलमध्ये झोपलेल्या प्रेमसिंगची २८ डिसेंबरच्या पहाटे गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. आरोपीने मेडिकलमधून ८ हजार ६५० रुपयांची रोकड चोरत पलायन केले होते. मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हत्येचा संपूर्ण थरार कैद झाला होता. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीला अटक करण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी जोरदार प्रयत्न करत होते. मात्र यश काही येत नव्हते. या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह आणखीन दोन महिलांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी विविध रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये कळवा, दादर आणि माहीम रेल्वे स्थानकातील फुटेजमध्ये तिघा आरोपींची छबी कैद झाली आहे. फुटेजमध्ये संशयीत आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. तरीही आरोपींचा थांगपत्ता लागलेला नव्हता. गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींची छयाचित्रे जारी करत आरोपी दिसल्यास तत्काळ गुन्हे शाखेला संपर्क करण्याचे आवाहन केले होते.