भोसरीत पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, सात वर्षाच्या मुलीचा आधार हरपला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/124.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून एकाने आपल्या पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार भोसरीत घडला. पोलिसांना लिहून ठेवलेली चिट्टी मिळाली आहे. मात्र, पती-पत्नीच्या एकत्र जाण्याने त्यांची सात वर्षाची मुलगी निराधार झाली आहे. प्रियंका निलेश देशमुख (वय 28, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर, निलेश ए. देशमुख (वय 32) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील आहे. कामाच्या शोधात त्याचे कुटुंब मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात स्थलांतरित झाले. तिथे निलेशची नात्यातील प्रियंका यांच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये घट्ट मैत्री तयार झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी दहा वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. सात वर्षांपूर्वी त्यांना एक मुलगी झाली. निलेश आणि प्रियंका आपल्या चिमुकल्या ‘स्वरा’सह पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आले. निलेश भोसरी येथील लांडेवाडी मधील एका कंपनीत काम करत होता. तर, प्रियंका या एका खाजगी कंपनीत बॅक आफिसला काम करीत होती. सहा महिन्यांपूर्वी निलेश, प्रियंका आणि स्वरा हे कुटुंब भोसरीमधील शास्त्री चौकात राहायला आले होते.
सोमवारी (दि. 13) प्रियंका यांनी स्वराला मैत्रिणीकडे पाठवले होते. रात्री नऊ वाजले तरी त्या स्वराला नेण्यासाठी आल्या नाहीत. त्यामुळे मैत्रिणीने त्यांना फोन केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सोमवारी रात्री मैत्रिणीने त्यांच्या मुलीला आपल्या घरी ठेवून घेतले. मंगळवारी (दि. 14) सकाळी पुन्हा मैत्रिणीने त्यांना फोन केला. तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मैत्रिणीचे पती आणि स्वरा प्रियंका यांच्या भोसरीतील घरी पोहोचले. घराचा दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. काही वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रियंका निपचित पडलेल्या आणि निलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांना आत्महत्येपूर्वी निलेशने लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. हिंदी भाषेत लिहिलेल्या चिठ्ठीत प्रियंका यांची आई वारंवार पैशांसाठी तगादा लावत असल्याचे सांगितले आहे. ‘बार बार पैसा मांग रहे हो, अब लेलो पैसा’ असे ही म्हटले आहे. घराच्या भाड्याबाबत देखील चिठ्ठीत लिहिले असून ‘डिपॉझिट मधून भाडे कापून घ्यावे’ असे चिठ्ठीत म्हटले आहे. निलेश यांच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तिला उद्देशून चिठ्ठीत म्हटले आहे की, ‘माँ, तुम्हारी बहु को लेकर तुम्हारे पास आ रहा हूँ.’ पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अमरावती आणि इंदोर येथून येणा-या दोघांच्या नातेवाईकांनी आपण येईपर्यंत त्यांची उत्तरीय तपासणी करू नये, असा आग्रह धरल्याने नातेवाईक आल्यानंतर दोघांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर, खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.