प्रकाश आंबेडकरांना धक्का, आनंदराज ‘वंचित’मधून बाहेर!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Anandraj-Ambedkar-Prakash-Ambedkar.jpg)
औरंगाबाद | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपली दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आनंदराज आंबेडकर यांनी वंचित आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्यासाठी घोषणा केली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या बहुजन संघटनांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचं काम आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून करत आहोत. नवीन कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून दलित समाजाला योग्य दिशा आणि सत्तेत घेऊन जाण्याचा निश्चय आम्ही केला आहे, अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
वंचित बहुजन विकास आघाडीला आम्ही कोणत्याही अटीशर्थीविना पाठिंबा दिला होता. ‘वंचित’साठी आम्ही प्रचंड काम केलं, मेहनत घेतली. पण, अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे दलित समाजात नैराश्य निर्माण झालं आहे. त्यामुळे समाज हा सैरभैर झाला आहे. त्यामुळे दलित समाजाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेना ही दलित समाजाची प्रमुख संघटना म्हणून दिसेल, असा विश्वास आनंदराज यांनी व्यक्त केला.