सोलापूर जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांना राष्ट्रवादीने केले निलंबित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/ncp1.jpg)
सोलापूर|महाईन्यूज|प्रतिनिधी|
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील सहा जिल्हा परिषद सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते बळिराम साठे यांनी याबाबतचे पत्र आज प्रसिद्ध केले आहे.
या सहा सदस्यांना अपात्र करावे, अशी मागणी गटनेते बळिराम साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची सोमवारी (ता. 13) सुनावणी होणार असून तत्पूर्वी राष्ट्रवादीने या सहा सदस्यांना निलंबित केले आहे.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त उद्या (रविवार) अकलूजमध्ये विविध कार्यक्रम व शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजीमंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहणार आहेत.
अकलूजमध्ये उद्या होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील भाजप व समविचारींचीही उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर भाजपची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत मंगळवारी (ता. 14) होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
उद्याच (रविवारी) कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शेकापच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सोलापुरात होणार असून या बैठकीत विषय समिती सभापतीच्या निवडीचे नियोजन केले जाणार आहे.