अभिनेता अक्षय कुमारविरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसांत तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/6-5.jpg)
मावळ्यांचा पेहराव करून चुकीच्या पद्धतीने जाहिरात केल्याचा आरोप
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
मावळ्यांचा पेहराव करून, अयोग्य पद्धतीने आयुष लिमिटेडच्या निरमा पावडरची जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारविरोधात संभागी ब्रिगेडने पुण्यात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पराक्रमी मावळ्यांचा आणि महाराष्ट्राच्या वीरवृत्तीचा या जाहिरातीद्वारे अपमान करण्यात आला आहे. मराठ्यांच्या अस्मिता दुखावली असल्याने ही जाहिरात त्वरित बंद करावी आणि राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
सध्या अक्षयकुमारने केलेली निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात समाज माध्यमांवरही व्हायरल झाली असून, अक्षय कुमार ट्रोल होत आहे. मर्द मराठा पराक्रमी मावळ्यांचा वेष परिधान करून अक्षयकुमारने शिंदेशाही पगडी घालून, या जाहिरातीत वीरपुरुषांचा अपमान करत आहे. त्यामुळे ही आक्षेपार्ह जाहिरात तात्काळ बंद करावी, अशी मागणी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी ब्रिगेडच्या संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट, प्रकाश धिंडले आदींनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्याकडे तक्रार केली आहे.