फास्टॅगचा तांत्रिक घोळ का मिटेना? चालकांमध्ये तीव्र संताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/fastag-new.png)
पुणे | महाईन्यूज
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल भरणा करण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अजूनही बहुतेक टोलनाक्यांवर फास्टॅग असूनही अनेकांना रोखीने टोल द्यावा लागत आहे. तर रोखीने पैसे देऊनही फास्टॅगमधून टोल जात असल्याच्या तक्रारी चालकांकडून केल्या जात आहेत. काहींच्या फास्टॅग खात्यातून जादा रकमेची टोलवसुली होत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे अजूनही टोलनाक्यांवरील रांगांमधून वाहन चालकांची सुटका झालेली नाही.
१५ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्याबाबतची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही तांत्रिक घोळ काय संपताना दिसत नाहीये.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तळेगाव टोलनाक्यावर अमेय हरदास यांच्या फास्टॅग खात्यातून १७३ ऐवजी ११६६ रुपये गेलेले आहेत. त्यानंतर खात्यात पुरेसे पैसे नसल्याने त्यांचे खाते बंदही झाले आहे. त्यांनी बँकेसह राष्ट्रीय महामार्र्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली. विनीत अहलुवालिया, दिव्य शहा यांना रोख पैसे दिल्यानंतर पुन्हा फास्टॅगमधून पैसे गेल्याचा अनुभव आला आहे. सचिन मोरे यांना शनिवारी पाटस मार्गावर टोलचे पैसे दोनदा द्यावे लागल्याचे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.वाहनाला फास्टॅग असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम मागितली जात आहे. त्यासाठी फास्टॅग खात्यात पुरेसे पैसे नाही, फास्टॅग स्कॅन होत नाही अशी कारणे दिली जात आहेत.