थंडीची हिमाचल प्रदेशात लाट; सिमला, मनालीत बर्फवृष्टी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/snow-fall.jpg)
सिमला | महाईन्यूज
शनिवारी अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशसह पंजाब व हरियाणा या राज्यांतील थंडीची लाट आणखी तीव्र झाली. काश्मिरात तुरळक ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली असतानाच किमान तापमान वाढल्याने थंडीची लाट थोडीशी कमी झालेली आहे. हिमाचल प्रदेशातील सिमला आणि मनाली येथे या वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेश गारठले आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक आनंदले आहेत. हवामान खात्याने पिवळा इशारा जारी केलेला आहे हा पिवळा इशारा किमान धोक्याचा संकेत देतो आहे. राज्यातील बहुतांश पर्यटन स्थळांवरील तापमान शून्याखाली आहे. सिमला, काल्पा, मनाली, डलहौसी, केलाँग यांचा त्यात समावेश आहे. केलाँग येथे सर्वाधिक कमी उणे १0.५ अंश तापमान राहिले आहे. काल्पा येथे उणे ३ अंश, मनाली येथे उणे १.२ अंश, तर डलहौसी येथे उणे 0.६ अंश तापमान राहिलेले आहे.
पंजाब आणि हरियाणातही थंडीची तीव्र लाट असून, ३.६ अंश तापमानासह फरीदकोट हे दोन्ही राज्यांतील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. पंजाबातील पतियाळा, अमृतसर, लुधियाना, हलवारा, भटिंडा आणि आदमपूर येथील तापमान ५ अंशांच्या खाली आहे. पठाणकोटमध्ये ६.८ अंश, तर गुरुदासपूरमध्ये ५.५ अंश तापमान राहिले. हरियाणातील कर्नाल आणि अंबाला येथे पारा अनुक्रमे ६.८ आणि ४.५ अंश राहिला. हिसार येथील तापमान ३.८ अंश राहिले. भिवानी, रोहतक, नारनौल, सिरसा ही शहरेही गारठली आहेत. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगढमध्ये ६.७ अंश तापमानाची नोंद झाली. अंबाला, कर्नाल, भिवानी, अमृतसर आणि लुधियाना येथे धुके पसरले आहे. काश्मीर खोरे, जम्मू आणि लदाख भागात अनेक ठिकाणी शनिवारी दोन ते पाच इंच बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या.