आगामी लोकसभा निवडणुकीत ४२९ जागा जिंकण्याचे मोदी-शहांना टेन्शन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-shaha-.jpg)
नवी दिल्ली : देशातील २० राज्यांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्याचा पराक्रम करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा ही जोडी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर चक्रव्यूहात अडकल्याचे दिसत आहे. ‘मिशन २०१९’साठी कंबर कसलेल्या मोदी-शहांना, १३ राज्यांमधील ४२९ लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘कमळ’ कसं फुलवायचं याची चिंता सतावू लागलीय. त्याचं कारण आहे, विरोधी पक्षांनी केलेली हातमिळवणी आणि त्यांच्यात वाढू लागलेली एकी.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, पण ऐनवेळी सत्तेने त्यांना हुलकावणी दिली. अक्षरशः त्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावला गेला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे काँग्रेस-जेडीएस एकत्र आले. त्यांना मायावतींनीही साथ दिली आणि बीएस येडियुरप्पांना अडीच दिवसांत मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. बहुमत चाचणीआधीच त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपा पार नाकावर आपटली. त्यानंतर, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने देशभरातील विरोधक एकत्र आलेत. कुमारस्वामींच्या शपथविधीला देशभरातील भाजपाविरोधी पक्षांचे नेते हजर राहणार आहेत. २०१९च्या लोकसभा महासंग्रामात मोदी-शहांचा विजयरथ रोखण्याचा विडाच त्यांनी उचललाय.