महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रणिती शिंदे यांची मंत्रिपदाची संधी हूकली

मुंबई |महाईन्यूज|
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा आज शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेसची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून काँग्रेसने तरुणांना संधी दिली आहे. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या युवा आमदार आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचे नाव नसल्याने त्यांची मंत्रिपदाची संधी हुकणार आहे.
काँग्रेसने आज मंत्रिपदासाठी १० नावे जाहीर केली आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केसी पाडवी, विजय वडेट्टीवर, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे आठ जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे तर सतेज उर्फ बंटी पाटील व डॉ. विश्वजित कदम हे दोघे जण राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
काल काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या दहा नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसच्या युवा आमदार म्हणून प्रणिती शिंदे यांची ओळख आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. त्यासंबंधीच्या बातम्याही गेल्या काही दिवसापासून येत होत्या. परंतु, आज सकाळी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये थोडीसी नाराजी पसरली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाही. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता आहे.





