डॉ. श्रीराम लागूंच्या पिंपरीतील बैठकीत आपण प्रभावीत झालो होतो – मानव कांबळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/WhatsApp-Image-2019-12-21-at-21.17.01-1.jpeg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
समाजातील लोकांच्या पुनरूत्थानासाठी डॉ. श्रीराम लागू विचार मांडून थांबले नाहीत, तर त्या विचारानुसार जीवन जगले, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी आज शनिवारी (दि. 22) येथे व्यक्त केली.
अंशुल क्रिएशन्स व अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिवंगत अभिनेते व समाजवादी, गांधीवादी विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहणेकामी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शहरातील विविध संस्था, संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. अंशुल क्रिएशन्सचे विजय जगताप, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सहकार्यवाह डॉ. राजेंद्र कांकरिया यावेळी व्यासपीठावर होते.
मानव कांबळे म्हणाले की, सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यासाठी त्यांनी हाती घेतलेल्या मोहिमेची एक बैठक पिंपरी येथील हॉटेल सुप्रीममध्ये १९८० मध्ये पार पडली होती. तेव्हा आपण कार्यकर्ते म्हणून उपस्थित होतो. त्यावेळेस त्यांच्या विचाराने आपण प्रभावित झालो होतो. पुढे एसईझेडच्या आंदोलनामध्ये त्यांच्याबरोबर काम करता आल्याचे त्यांनी म्हटले.
डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये डॉ. लागूंचे योगदान व डॉ. दाभोळकर यांच्याबरोबर असलेले त्यांचे सख्य व प्रेम खूप जवळून अनुभवता आले. तर, दलित वस्तीमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीला ‘परमेश्वराला रिटायर करा’ या विषयावरील व्याख्यानाला त्यांना घेऊन आल्याची आठवण विजय जगताप यांनी सांगितली.
यावेळी लेखक श्रीकांत चौगुले, नाटय परिषदेचे किरण येवलेकर, शब्दधन काव्यमंचचे सुभाष चव्हाण, मराठी भाषा संवर्धन समितीचे संभाजी बारणे, साहित्य संवर्धन समितीचे सुरेश कंक, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, नागरी सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेचे प्रा. प्रविण देशमुख, जगद्गुरू प्रतिष्ठानचे ॲड. लक्ष्मण रानवडे, दिलीप वाघ, ॲड. मनिषा महाजन आदींनी आठवणींनी उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. तर, संविधान जनजागरण अभियानाचे विष्णू मांजरे यांनी आभार मानले.