महाईन्यूज | पटना
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इंटरनेटवरील पॉर्न साइट्सवर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. यापूर्वी देखील नितीश कुमार यांनी बलात्काराच्या घटना या पॉर्न साइट्समुळेच होतात, असे भाष्य केलेले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध राज्यात महिलांवर झालेले अत्याचार आणि हत्येच्या घटनांमुळे देशात खळबळ उडालेली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात अशा घटना घडतानी दिसत आहेत. त्यामुळे ही बाब अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे, असे सांगत नितीश कुमार यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी पॉर्न साइट्सवर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र नरेंद्र मोदींना लिहिलेले आहे.
इंटरनेटवरील लोकांच्या अमर्याद प्रवेशामुळे मुले आणि तरुण अश्लील, हिंसक आणि अनुचित गोष्टी पाहत आहेत. इंटरनेटच्या प्रभावामुळे अशा काही घटना घडत असतात व बर्याचदा अशा प्रकरणांमध्ये गैरवर्तनाच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडिया – व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादीवर तयार केले जातात आणि व्हायरल केले जात आहेत. विशेषकरून या प्रकारच्या सामग्रीचा लहान मुले आणि काही तरूणांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होत आहे, असे नितीश कुमार यांनी पत्रात म्हटलेले आहे.