भोसरीत स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे, मुलींची सुरक्षितता धोक्यात, बसचालक मोकाट
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
इंदायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळेच्या स्कूल बसचालकाने बसमध्ये विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शालेय मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी बस चालकावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाल लैंगीक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहे.
दिलीप पांडुरंग काळे (वय 24, रा. पद्मावती मंदिराजवळ, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात बाल लैंगीक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप काळे हा इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळेच्या स्कूलबसचा चालक आहे. शनिवारी (दि. 14) पहाटे पाचच्या सुमारास विद्यार्थिनीला घेण्यासाठी काळे बस घेऊन ती रहात असलेल्या घरासमोर गेला. विद्यार्थिनी बसमध्ये चडल्यानंतर त्याने तिच्या अंगाशी लगट साधली. जबरदस्तीने तिचा हात हातात धरून तिच्याशी अश्लिल वर्तण केले. त्यानंतर शाळेच्या बाहेर बस उभी असताना देखील काळेने तिच्याशी अश्लील वर्तण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे तक्रारीत नमूद आहे. आणि, जर हा प्रकार घरच्यांना सांगितला तर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली. हा प्रकार मुलीने तिच्या घरच्यांना सांगितल्यानंतर बसचालक काळेच्या विरोधात पोलिस तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकारामुळे शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील स्कूल बसमध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात काही शाळेतील विद्यार्थिनींवर स्कूल बसमध्ये जबरदस्तीचे प्रकार घडले आहेत. असा मस्तवालपणा करणा-या स्कूल बसचालकाविरोधात पोलीस कडक भूमिका घेत नसल्यामुळे शालेय विद्यार्थिनींना असुरक्षित वातावरणाचा सामना करावा लागत आहे.





