अनेक जन्म घेतले तरी, राहूल गांधी ‘सावरकर’ बनू शकणार नाही : ‘आरएसएस’ नेते इंद्रेश कुमार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Indresh-Kumar.jpg)
काँग्रेसवर भाजप, शिवसेनेसह विरोधकांची टीका
मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक जन्म घेतले, तरी ते ‘सावरकर’ बनू शकत नाहीत आणि त्यांनी आपले आडनाव ‘गांधी’ वापरुन महात्मा गांधींचा अपमान करू नये, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केली आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी रांचीमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते, “नरेंद्र मोदी म्हणाले होते, मेक इन इंडिया, मात्र सध्या तुम्ही कुठेही पाहिल्यास ‘रेप इन इंडिया’ दिसतं.”
“उत्तर प्रदेशात उन्नावमध्ये मोदींच्या आमदारानं एका महिलेवर बलात्कार केला. नंतर पीडित महिलेच्या गाडीला अपघात झाला. मात्र, नरेंद्र मोदींनी अवाक्षरही काढला नाही,” असं ते म्हणाले होते. हाच धागा पकडत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर महिला खासदारांनी लोकसभा सभागृहात राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला होता. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना “मरेन मात्र माफी मागणार नाही,” असं ते शनिवारी आयोजित या रॅलीत सावरकरांचा उल्लेख करत म्हणाले.
इंग्रजांनी सावरकर यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. या शिक्षेत सूट मिळावी, यासाठीचे अर्ज सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे केले होते. याचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं होतं.