माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय सन्यास ! पिंपरीच्या आण्णांचं काय ?
- पिंपरीतील कार्यकर्त्यांना लागली प्रचंड उत्सुकता
- अजित पवारांना पाठिंबा देणारे एकमेव आमदार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यातील अकल्पनिय राजकीय नाट्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन आज महाराष्ट्राला धक्का दिला. आपण ”राजकीय सन्यास” घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. खरोखर अजित पवार यांनी राजकीय सन्यास घेतला तर पिंपरीचे दस्तुरखुद्द आमदार आण्णा बनसोडे कोणती भूमिका घेणार, याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्ता स्थापनेचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. राष्ट्रवादीसोबत अजित पवार यांनी बंड केल्याने राज्यातील राष्ट्रवादीचे सर्वच आमदार दादांच्या विरोधात गेले होते. त्यानंतर ”आम्ही साहेबांसोबत…”, ”आम्ही 80 वर्षाच्या योध्यासोबत !” अशी टॅगलाईन सोशल मीडियावर चालवली गेली. विशेष म्हणजे शपथविधी होताना दादांच्यासोबत असलेले दिग्गज आमदार देखील साहेबांकडे परतले होते.
परंतु, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी खंबीरपणे दादांना पाठिंबा दिला होता. राज्यातील राष्ट्रवादीचे आमदार पाठींबा काढून घेत असताना केवळ एकमेव आमदार आण्णा दादांच्या पाठीशी उभे होते. आजही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे पिंपरीतील त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आज देखील त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याच्या काहींनी तक्रारी केल्या आहेत. आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राजकीय सन्यास घेत असल्याचेही दादांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. जर अजित पवार राजकीय सन्यास घेणार असतील तर पिंपरीचे आण्णा काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





