महाराष्ट्रात मोठा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तर भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
राज्यात एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं वाटत असतानातच, भाजपने राजकारणात मोठा भूकंप घडवला. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा मांडण्यास तयार झाली. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत सहमती देखील झाली. परंतु आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला.





