रेल्वेची खासगी तत्त्वावरील तेजस एक्स्प्रेस फायद्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Tejas-11.jpg)
रेल्वेने ‘खासगी तत्त्वावर’ चालवलेली पहिलीच गाडी फायद्यात धावली आहे. आयआरसीटीसीतर्फे संचालित तेजस एक्स्प्रेसने यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवळपास ७० लाखांचा नफा मिळवला असून, तिकिटांच्या विक्रीतून सुमारे ३.७० कोटींचा महसूल मिळवला आहे.देशातील ५० रेल्वे स्थानकांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्याचा आणि आपल्या जाळ्यामध्ये १५० गाडय़ा चालवण्याची खासगी ट्रेन ऑपरेटर्सना परवानगी देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असून; इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची लखनौ- दिल्ली तेजस एक्स्प्रेस हा त्याचाच एक भाग आहे.
५ ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून ही गाडी सरासरी ८० ते ८५ टक्के प्रवाशांसह धावली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ५ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत (२१ दिवस, कारण ही गाडी आठवडय़ातून ६ दिवस धावते) ही गाडी चालवण्यासाठी आयआरसीटीसीला ३ कोटी रुपये खर्च आला. ही अत्याधुनिक गाडी चालवण्यासाठी दररोज सुमारे १४ लाख रुपये खर्च करणाऱ्या रेल्वेच्या या उपकंपनीने प्रवासी भाडय़ातून दररोज सुमारे १७.५० लाख रुपये कमावले.लखनौ- दिल्ली मार्गावरील तेजस एक्स्प्रेसच्या रूपात गैर रेल्वे ऑपरेटरमार्फत आणि आपल्या स्वत:च्या उपकंपनीमार्फत एखादी गाडी चालवण्याचा रेल्वेचा हा पहिलाच अनुभव आहे.