पोषण आहाराअभावी मुंबईतील मुलांचे आरोग्य धोक्यात !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/458.jpg)
मुंबई | महाईन्यूज
शालेय पोषण आहार वेळेवर मिळत नसल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या मुलांवर होत असताना दिसत आहे. पोषणाअभावी मुलांचं वजन सामान्यंपेक्षा कमी आहे. यामुळे मुलांना अनेक प्रकारचे रोग होण्याचा धोका आहे, असा दावा प्रजा फाऊंडेशनच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या अहवालानुसार, अंगनवाडीतील 17 टक्के मुलं आणि मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) शाळेत शिकणाऱ्या 3 टक्के मुलांचं वजन सामान्यंपेक्षा कमी असल्याचं सिध्द झालं आहे.
प्रजाने यासंबंधी आरटीआय दाखल केला होता. त्याअंतर्गत बीएमसी आणि ‘इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्विस (ICDS)’कडून देण्यात आलेल्या उत्तरात ही माहिती समोर आली. 2018-19 मध्ये अंगनवाडीच्या 2.86 लाख मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 48,849 म्हणजेच तब्बल 17 टक्के मुलांमध्ये पोषणाची कमतरता दिसून आली. तर बीएमसी शाळेत शिकणारे 2.26 लाख मुलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 7,383 मुलांचं वजन त्यांच्या वयानुसार कमी असल्याचं निदर्शनास आलं. जानकारांनुसार, पोषण आहाराच्या कमतरतेमुळे मुलांचं वजनच कमी होत नाही तर त्यांना अनेक प्रकारच्या शारिरीक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं.
2018-19 मध्ये बीएमसी बजेट दरम्यान आयुक्तांनी बीएमसी शाळेतील मुलांना ‘सप्लीमेंटरी न्यूट्रीशन’ देण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण, शाळांमध्ये हे पूरवण्यासाठी बीएमसीला कुणीही ठेकेदार मिळाला नाही. त्यामुळे आतापर्यंत यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही, असा दावा प्रजाने केला आहे.