LOC वर पाकिस्तानचा तुफान गोळीबार, एका नागरिकाचा मृत्यू, पाच जखमी
भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लाँच पॅडस उद्धवस्त केल्यानंतरही पाकिस्तान सुधारलेला नाही. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
कुपवाडाच्या माचिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. मंगळवार रात्रीपासून पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरु आहे. भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये पाच बिगर काश्मिरी मजुरांची हत्या केली. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील हे सर्व मजूर होते. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोठया प्रमाणावर शोध मोहिम सुरु आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले.