पुण्यासह पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा पावसाने झोडपले, अनेकांच्या घरात पाणी शिरले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/EHdJ8PBU0AAzsdo.jpg)
पुणे – पावसाने पुणेकरांना पुन्हा झोडपले आहे. यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांचा सामाना करावा लागतोय. या पावसामुळे शहराच्या अनेक भागातील घरात पाणी शिरले. कात्रज आणि लोहगाव भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आंबिल ओढ्याला पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले.
रात्रभर झालेल्या या पावसाने येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, आझादनगर, बी टी कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड भागातील घरामध्ये पाणी शिरले होते. यासोबतच पद्मावतीच्या गुरुराज सोसायटीमध्ये आज पहाटे पुन्हा पाणी घुसले. पाच इमारतीच्या तळमजल्यावरील सदनिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे. सोसायटीची सीमा भिंत आधीच्या पावसात कोसळल्यामुळे तेथूनच पाणी पुन्हा सोसायटीत घुसले आहे.
यासोबतच पुण्याजवळील लोहगाव जकात नाक्यावर खासगी बस ओढ्याच्या पाण्यात बंद पडली. बसमधील 20 कर्मचारांना अग्नीशामक दलाकडून सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. पुण्यात रात्रभर झालेल्या या पावसाची पुणे वेधशाळेत 42.4 मिमी इतकी नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. लोहगाव जकात नाक्याजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. लोहगाव, येरवडा, नगर रोड परिसरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. सकाळी लवकर कामाला जाणारे कामगार, स्कुल बस या पाण्यातून आपल्या गाड्या घालून जाताना दिसत होते.