breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांची अपेक्षा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी हवा नवा चेहरा!
– सत्ताधा-यांविरोधात ठोस भूमिका घेण्याची गरज
पिंपरी – आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीची चाव्या १५ वर्ष एक हाती ठेवलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे लोकसभा, विधानसभा आणि गतवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत अक्षरश: पानिपत झाले. त्यामुळे पक्षाचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करुन नव्या चेह-यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवडला राज्यातील विकासाचे ‘रोल मॉडेल’ केलेल्या राष्ट्रवादीला गत निवडणुकांमध्ये दारुन पराभव स्वीकारावा लागला. कारण, पक्षातील अनेकांनी ‘भाजप’चा झेंडा खांद्यावर घेतला. अन्यथा पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. ‘घरभेदी’ प्रवृत्तीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र, काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत पराभव पत्करला. पण, पक्षाशी कोणत्याही आमिषाला बळी पडून ‘काडीमोड’ घेतला नाही. सध्यस्थितीला पक्षाची जी काही ताकद शहरात दिसते. ती केळव निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेमध्ये निष्ठावान आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा सूर दिसत आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी जुन्या मात्तबरांना सल्लागार व मार्गदर्शकाची भूमिका बाजाण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, पक्ष संघटनेत नव्या चेह-यांना संधी देण्याचे सूतोवाच केले आहे. प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणचे पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी निष्ठावान आणि नवीन चेह-याला मिळते की पुन्हा तेच-ते नेतृत्त्व कार्यकर्त्यांवर लादले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदी दत्ता साने यांची नियुक्ती करण्यात आली. त्याद्वारे भोसरी विधानसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना ताकद देण्यात आली. त्याच धर्तीवर चिंचवडमधील संभाव्य उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना ताकद देण्यासाठी शहराध्यक्षपदी चिंचवडमधील नव्या चेह-याला संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्यस्थितीला शहरातून शहराध्यक्षपदासाठी नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, युवा नेते संदीप पवार आणि अमित बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी, संदीप पवार आणि प्रशांत शितोळे यांना संधी देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, असे माहिती राष्ट्रवादीतील एका दिग्गज नेत्याने दिली.
संजोग वाघेरे यांची संभ्रमावस्था?
राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. सध्यस्थितीला वाघेरे यांना मावळ लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदी नव्या चेह-याला संधी देवून वाघेरे यांना लोकसभेवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत प्राधान्य द्यावे लागणार आहे. कारण, गत लोकसभा निवडणुकीत मावळमधून पक्षाला उमेदवार आयात करावा लागला होता. तशी परिस्थिती आगामी निवडणुकीत निर्माण होवू नये म्हणून आतापासूनच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. परंतु, शहरातील एक गट वाघेरे यांनाच शहराध्यक्षपदी कायम ठेवावे म्हणून सक्रीय झाला आहे. त्याला भाजपमधील बड्या नेत्यांनी ‘ताकद’ दिली आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळायची की लोकसभेची तयारी करायची, अशी संभ्रमावस्था संजोग वाघेरे यांची झाली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संदीप पवार यांना निष्ठेचे फळ मिळणार?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संदीप पवार यांची ओळख आहे मुळशी पंचायत समितीचे तत्कालीन सभापती रमननाना पवार यांनी २००१ पासून राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. महापालिका समावेशानंतर ताथवडेच्या पहिल्या नगरसेविका यमुना पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. गेल्या महापालिका निवडणुकीत संदीप पवार यांनी ताथवडे पुनावळे, काळाखडक-वाकड प्रभागातून निवडनुक लढविली होती. त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष आणि विद्यमान गटनेते तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदार संघातील संभाव्य उमेदवार राहुल कलाटे यांच्या विरोधात काट्याची टक्कर दिली होती. विशेष म्हणजे, ताथवडे गावातील विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाविरोधात न्यायालयात स्थानिक नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू युवा चेहरा राष्ट्रवादीमध्ये तयार होत आहे. शहराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत संदीप पवार यांच्या पक्षनिष्ठेचे फळ मिळणार का? अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.