विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/pune-university-022_201809134543.jpg)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून होणारा सुविधांचा वापर, विद्यार्थ्यांच्या सुविधा-शुल्क अशी सर्व माहिती या ओळखपत्राशी जोडण्यात आली असल्याने नवी धोरणे ठरवण्यासाठी हे ओळखपत्र येत्या काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आतापर्यंत विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात येत नव्हते. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक विभागाचे ओळखपत्र, ग्रंथालयाचे ओळखपत्र अशी वेगवेगळी ओळखपत्र सांभाळावी लागत होती. मात्र, गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ओळखपत्र देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी यंदा करण्यात आली आहे. वन कॅम्पस, वन आयडी कार्ड या संकल्पनेतून हे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र तयार करून देण्यात आले आहे.
या युनिक नंबर असलेल्या या ओळखपत्रात माहिती साठवून ठेवण्याची क्षमता (मेमरी कार्ड) आहे. तसेच या ओळखपत्राची नक्कलप्रत (डुप्लिकेट) करता येणार नाही. या ओळखपत्राला विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शुल्कासह विद्यापीठाच्या योजनांतील सहभाग, ग्रंथालय-क्रीडा संकुलातील प्रवेश जोडण्यात आले आहे. त्यामुळे ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.
- ओळखपत्र हा पहिला टप्पा
‘विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र देण्यामागे व्यापक विचार करण्यात आला आहे. भविष्यवेधी विचार असलेल्या प्रकल्पाचा ओळखपत्र हा पहिला टप्पा आहे. विद्यापीठ प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या सुविधांचा विद्यार्थ्यांकडून किती प्रमाणात वापर होतो, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, अशी सर्व माहिती या ओळखपत्रामुळे संकलित होऊ शकेल. त्याचा विद्यापीठ प्रशासनाला धोरणे आखण्यासाठी उपयोग होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती किंवा तत्सम तक्रारींवर उपाययोजना करण्यासाठीही ओळखपत्र उपयुक्त ठरेल,’ अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.