शरद पवारांकडून निर्णय मागे, ईडी कार्यालयात जाणार नाहीत
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास रद्द केला, अशी माहिती शरद पवारांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. कायद्या आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय, मला ईडीकडून पत्र आलं होतं की चौकशीसाठी येऊ नये, असं पवार म्हणाले.
मी चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे, निवडणुकांमुळे मी महाराष्ट्र दौऱ्यावर असेन, त्यामुळे आधीच ईडी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न आहे. ईडीने मला पत्र पाठवून चौकशीची तूर्तास गरज नसल्याचं म्हटलं. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, त्याची प्रतिक्रिया जिल्ह्याजिल्ह्यात दिसत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिकट अवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करतोय, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याअगोदर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करत मुंबईत जमावबंदी लावली आहे. पवार यांनी स्वत: ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. पवार ईडी कार्यालयात जाणार त्यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात गर्दी केली जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.