वाढदिवस पार्टीबद्दल ५ पोलिसांचे निलंबन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/Untitled-12-31.jpg)
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरे करणे भांडुप पोलिसांना चांगलेच भोवले. यातील एका प्रकरणाची दखल घेत पाच पोलीस अधिकाऱ्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले.
अयान खान ऊर्फ उल्ला या तरुणाच्या वाढदिवसाच्या पोलीस ठाण्यात झालेल्या पार्टीची छायाचित्रे व चित्रफिती समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी खातेअंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेले उपनिरीक्षक पंकज शेवाळे, सचिन कोकरे, हवालदार सुभाष घोसाळकर, पोलीस नाईक अनिल गायकवाड, शिपाई मारुती जुमले यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त अखिलेशकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वाची खातेनिहाय प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश खाडे आणि रात्रपाळी निरीक्षकाच्याही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या मनुष्यबळावर नियंत्रण नाही, असा ठपका खाडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अयानच्या आधीही पोलीस ठाण्याच्या मुख्य इमारतीत, बीट चौक्यांवर अशा प्रकारे अन्य तरुणांचे वाढदिवस साजरे झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे वाढदिवस गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या तरुणांनी साजरे केले आहेत. त्या सर्वावरही कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.