नागरिकांनो, रेडझोन जागा विकत घेऊ नका, अनधिकृत बांधकामांना मज्जाव करा, असा आदेश दिल्याचा खुलासा
![आयुक्तांनी मागितली समस्त पिंपरी-चिंचवडकरांची 'माफी'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/hardikar-sir-1.jpg)
– स्थापत्य विभागास दिलेला आदेशावरून आयुक्तांचा ‘स्थायी’ सभेत घुमजाव
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन हद्दीतील नागरी वस्त्यांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोणत्याही सार्वजनिक नागरी सोईसुविधा पुरवू नयेत, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थापत्य विभागास दिले आहेत. त्यावरून स्थायी समिती सभेत मुद्दा उपस्थित झाल्याने आयुक्तांनी सदरचा आदेश दिला नसल्याचा खुलासा केला. त्या भागांत जागा विकत घेऊन नागरिकांनी घरे बांधू नयेत. नव्याने अनधिकृत बांधकामांना मज्जाव करावा, असे आदेश दिल्याचे सांगत घुमजाव केला.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (दि.31) झालेल्या सभेच्या अध्यक्षपदी विलास मडिगेरी होते. पालिकेच्या हद्दीतील रेड झोन परिघात हजारो अनधिकृत बांधकामे निर्माण झाली आहेत. तर, भोसरी, दिघी, वडमुखवाडी, मोशी या रेड झोन परिसरात प्लाँटिंग करून जागेची विक्री करण्याचा धंदा तेजीत आहे. स्वस्तातील जागा मिळत असल्याने अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. या अनधिकृत बांधकामांना कोणत्याही नागरी सुविधा पुरवू नयेत, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी 11 जुलैला स्थापत्य विभागास दिले आहेत.
या आदेशावर चक्रपाणी वसाहत, भोसरी येथील भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे व तळवडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पंकज भालेकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. रेड झोन परिसरात अनेक वर्षांतून घरे आहेत. त्यांना नागरी सुविधा पुरविणे पालिकेचे कर्तव्य आहे. तेथील रहिवाशांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
खुलासा करताना आयुक्त हर्डीकर म्हणाले की, सदर आदेश भोसरी, वडमुखवाडी, दिघी, मोशी येथील रेड झोन हद्दीतील भागांसाठी आहे. त्या भागांत मोठ्या प्रमाणात जागेची प्लॉटिंग करून जागा विक्री केली जात आहे. नागरिक त्या जागा खरेदी करून अनधिकृतपणे बांधकाम करीत आहेत. अनधिकृत बांधकामधारकांना रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, वृक्ष सुशोभीकरण, आरोग्यविषक सेवा, कचरा संकलन आदी नागरी सुविधा न पुरविण्याचे आदेश स्थापत्य विभागास दिले आहेत. या संदर्भात वृत्तपत्रात जाहिर निवेदन एप्रिल 2019 ला प्रसिद्ध करण्यात आले होते.