शिवसेनेच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नगरिकांचा प्रचंड प्रतिसाद
पिंपरी, (महाईन्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथे आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामध्ये विविध शासकीय दाखले एकाच ठिकाणी व एकाच दिवशी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभले.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, अपंग दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न, रहिवासी दाखले, तसेच रेशनकार्ड संबंधीची सर्व कामे एकाच ठिकाणी जागेवर उपलब्ध करण्याची व्यवस्था उभारण्यात आली होती. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, उपशहर प्रमुख तुषार नवले, शहर महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा उपसंघटिका शैला पाचपुते, विभागप्रमुख शैला निकम, माजी नगरसेवक संजय नाना काटे, माजी शहर संघटिका मंगला घुले, युवानेते गोपाळ मोरे, युवती सेना प्रमुख प्रतिक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके आदी उपस्थित होते.
यावेळी बाळा कदम म्हणाले की, शिवसेनेने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची व त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जपलेली बांधिलकी म्हणजे पक्षाचा पाया आहे.
आमदार चाबुकस्वार म्हणाले की, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पिंपरी, मोहननगर, आकुर्डी या तीन ठिकाणी यापूर्वी शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी झाला आहे. सुमारे आठ हजार नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांनी सर्वांचे स्वागत केले. तर, माजी नगरसेवक संजय काटे यांनी आभार मानले. या शिबिरामध्ये फुगेवाडी, दापोडी व बोपखेल भागातील सुमारे ३ हजार स्त्री-पुरूषांनी सहभाग घेतला.