यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी पालिकेकडून दोन कोटींचा धनादेश सुपूर्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/DSC_9701a.jpg)
- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते धनादेश केला सुपूर्द
- स्मारक समितीने लवकरच काम हाती घेण्याची ठेवली तयारी
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2 कोटींचा धनादेश यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज सुपूर्द केला.
कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समिती ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणीकृत संस्था आहे. या समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत निगडी प्राधिकरण येथे कै. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये गोर-गरिब, अनाथ व अपंगांसाठी अभ्यासिका, वसतीगृह, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय व वाचनालय, व्यायामशाळा, आयुर्वेदिक उपचार केंद्र, कॉन्फरन्स हॉल बांधण्याचे नियोजन आहे.
त्यासाठी पिंपरी महापालिकेतर्फे आर्थिक मदत करण्याची विनंती यशवंतराव चव्हाण स्मारक समितीने केली होती. त्यानुसार पालिकेने पाच कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहिर केले आहे. तशा प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी देऊन महासभेकडे शिफारस केली होती. त्यातील 2 कोटी रुपयांचा धनादेश आज काढण्यात आला. स्मारक समितीच्या नावे असलेला हा धनादेश आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच स्मराकाच्या पायाभरणीचे काम सुरू करण्याची तयारी समितीने ठेवली आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक धोरणांमुळेच पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात मोठे उद्योगधंदे उभे राहिले. अल्पावधीतच शहराची ओद्योगिकनगरी अशी ओळख झाली. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारुपास आले. यशवंतरावांनी राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणांमुळेच लाखो हातांना रोजगार मिळाला. उद्योगांना चालना मिळाली. व्यापा-यांना व्यापार मिळाला. त्यांचे हेच ऋण फेडण्याचे औचित्य मिळावे. त्यांच्या कार्याची प्रेरणा व स्फूर्ती भावी पिढीतील युवकांना मिळावी. यासाठी त्यांचे पालिका क्षेत्रात स्मारक असणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक शहरात उभे राहण्याकरिता समितीला पाच कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.